राज्यात रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या! सरकारनेच दिली कबुली

मुंबई : गेल्या ५६ महिन्यांत राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करताहेत, ही माहिती अंशत: खरी आहे, अशी कबुली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, शेतीसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत याबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मकरंद जाधव म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. गेल्यावर्षी मराठवाड्यात ९५२, अकोल्यात १६८, वर्ध्यात ११२, बीडमध्ये २०५, तर अमरावती विभागात १०६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर विभागात ९५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ७०७ शेतकऱ्यांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले, तर ४३३ जणांना मदत देण्यात आली.
बीड जिल्ह्यात १६७ जणांना मदत देण्याबाबत मान्यता देण्यात आली, तर १०८ जणांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली. अमरावती विभागात ४४१ जण मदतीसाठी पात्र ठरले, तर ३३२ जणांना मदत मिळाली. जालना तालुक्यातील मंठा तालुक्यात एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान १३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.
आत्महत्यांना सरकार जबाबदार
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कैलास नागरेच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान, राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही.





