मुंबई – कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे या ठिकाणचे वातावरण तापले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यानुसार मंगळवारपर्यंत या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अन्य दोघांना बुधवारी अटक करण्यात आली. दरम्यान, हत्या करण्यात आलेल्या 23 वर्षे वयाच्या कार्यकर्त्याचे नाव हर्षा असे होते आणि रविवारी रात्री भारती कॉलनी परिसरातल्या रविवर्मा मार्गावर काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वी, हिजाबच्या मुद्द्यावरून शिवमोगामधील काही महाविद्यालयांमध्ये अलीकडेच तणाव निर्माण झाला होता. मात्र, हर्षा यांच्या हत्येमागे नेमके काय कारण होते, हे समजू शकलेले नाही. या हत्येनंतर बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी दगडफेक केली. मात्र, त्यांनी कोणाला लक्ष्य करण्यासाठी ही दगडफेक केली हे समजू शकलेले नाही. या हत्येमागे मुस्लीम गुंडांचा हात असल्याचा आरोप शिवमोगाचे आमदार आणि राज्यातील ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. ईश्वरप्पा यांनी केला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे समाजविघातक घटकांना उत्साह आला असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवकुमार यांनी काही प्रक्षोभक वक्तव्ये केल्यामुळे मुसलमान गुंडांना चिथावणी मिळाल्याचे ते म्हणाले.