शिरूर तालुक्यातील बेट भागात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जांबुत – शिरूर तालुक्यातील बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबुत, वडनेर खुर्द, चांडोह, फाकटे, शरदवाडी आदी गावांमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरखेड येथे ग्रामपंचायतीमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गोपाळराव दाभाडे यांच्या हस्ते, जांबुत येथे सरपंच दत्तात्रय जोरी, ग्रामविकास शिक्षण संस्थेत अध्यक्ष खुशाल बोंबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक पी.सी. बारहाते, काठापूर खुर्द येथे सरपंच सिमा थिटे, चांडोह येथे द्रौपदी शेलार आणि फाकटे येथे सरपंच रेश्मा पिंगळे यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी गावांमधून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांनी संचलन, कवायत आणि इतर प्रत्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला.
या कार्यक्रमांना माजी सभापती बाळशिराम ढोमे, सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खुशाल बोंबे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोंबे, दामू दाभाडे, कैलासराव बोंबे, भाऊसाहेब ढोमे, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, माजी सरपंच भिवाजी बोंबे, माजी सैनिक बळवंत बोंबे, रामदास ढोमे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी बबनराव बोंबे, ज्ञानेश्वर ढोमे, रामदास बराटे, अनिल वरे, युवराज गावशेते, शरद बोंबे, ग्राममहसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, ग्रामविकास अधिकारी आशिष भागवत, कोतवाल सारिका वरे, प्राचार्य रामदास मगर, सुशिता बराटे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दाभाडे कुटुंबियांचा अनोखा उपक्रम
पिंपरखेड गावचे सुपुत्र आणि दिवंगत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गबाजी दाभाडे उर्फ जी.पी. दाभाडे यांच्या कुटुंबियांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबवला. त्यांचे सुपुत्र विकास दाभाडे आणि योगेश दाभाडे यांनी विद्यार्थ्यांसाठी सुमारे २,५०० छत्र्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून, दाभाडे कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे.





