मुळशीत ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या हस्ते ध्वजावंदन

पौड : मुळशी तालुक्यात भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीचा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला. तहसिल कार्यालय, शासकीय संस्था, शाळा-महाविद्यालये आणि गावागावांतील सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडले.
पौड येथील तहसिल कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने वातावरणात देशभक्तीचा उत्साह संचारला. उपस्थितांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या सोहळ्यास तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, दुय्यम निबंधक एम. व्ही. क्षीरसागर, मंडलाधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस दलाचे जवान, शिक्षक, महिला आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पौड येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसिल परिसर स्वच्छ आणि आकर्षकपणे सजविण्यात आला होता, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.





