पुणे | परदेशी शिष्यवृत्तीचा ७५ विद्यार्थ्यांना लाभ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्यात आल्या आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या ठरविण्यात आली असून, आता २७ एवजी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
सर्व विभागांच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेत एकवाक्यता आणण्यासाठी राज्य शासनाकडून निकष ठरविण्यात आले आहेत.
त्यानुसार एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. त्यापेक्षा जास्त मुलांना परदेश शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल. मात्र, या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवीचा अभ्यास सुरू असताना त्या विद्यार्थ्यास डॉक्टरेट पदवी (पीएच.डी.) साठी शासन निर्णयात अंतर्भूत विषयात दर्जावाढ करण्याची संधी मिळाल्यास विद्यार्थी याच योजनेअंतर्गत पुढील अभ्यासक्रमासाठी लाभ घेण्यास पात्र असेल.
अल्पसंख्याक समुदायातील लोकसंख्येच्या प्रमाणात शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या ठरली आहे. एखाद्या समुदायाचे पात्र विद्यार्थी कमी झाल्यास आंतरबदलाने अन्य समुदायाच्या विद्यार्थ्यांना त्या रिक्त जागांचा लाभ देण्यात येईल.
मुस्लिम – ४२, बौद्ध- २१, ख्रिश्चन – ४, जैन- ४, पारशी – १, ज्यु – १, शीख- २ याप्रमाणे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या ठरली आहे.
पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी ५५, तर पीएच.डी. साठी २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित -२८, औषधी व जैवशास्त्र -१७, लिबरल आर्ट व ह्युमॅनिटीज- १७, शेतकी – ७, कायदा व वाणिज्य – ६ याप्रमाणे अभ्याक्रमनिहाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल.
मेरीट डावलले जाणार नाही
एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटुंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहिल्यास एका कुटुंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल.
निवड प्रक्रियेची निकड लक्षात घेता विद्यार्थी पूर्ण क्षमतेने उपलब्ध न झाल्यास संबंधित विभागास वर्षातून एकपेक्षा अधिक वेळा निवड प्रक्रिया राबविण्याची मुभा राहील. मात्र, त्यात विद्यार्थ्यांचे मेरीट डावलले जाणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.





