पुणे जिल्हा | शिरुरची ७२ गावे बिबट प्रवणक्षेत्र

शिक्रापूर, – पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढू लागला असताना अनेक दुर्घटना देखील समोर येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील २३३ अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत.
यामध्ये शिरुर तालुक्यातील ७२ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रांची संख्या लक्षणीय आहे.
शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यात सात वनपरिक्षेत्र कार्यालय असलेल्या गावांमध्ये शेतीचे क्षेत्र मोठे असल्याने येथे पाण्यासाठी असलेल्या नद्या तसेच चासकमान कालवे यामुळे शेती मोठ्या प्रमाणात आहे.
ऊस, डाळिंब, मका यांसह आदी पिकांची शेती तसेच डोंगर आदींमुळे बिबट्याला मुबलक वातावरण तसेच भक्ष्य मिळत असल्याने बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे.
कित्येक ठिकाणी बिबट्याने नागरिकांसह जनावरांवर हल्ले केल्याने काही दुर्घटना घडून नागरिकांचा जीव सुद्धा गेलेला आहे.
काही दिवसांपासून काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिसवे यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यांतील २३३ गावे संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
शिरुर तालुक्यातील ७२ गावांचा समावेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील तालुक्यांत चार महिन्यांत दोनजण गंभीर जखमी तर चौघांचा मृत्यू झाला आहे. पाच वर्षात चाळीस जण गंभीर जखमी होऊन सोळा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुढील कामात नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
शिरुरची घोषित गावे
अण्णापूर, अरणगाव, आपटी, आलेगाव पागा, इनामगाव, करंदी, कुरुळी, गणेगाव दुमाला, गुणाट, पिंपरखेड, चांडोह, चिंचणी, जांबूत, जातेगाव खुर्द, टाकळी हाजी, तांदळी, निमगाव म्हाळुंगी, निमोणे, न्हावरा, पिंपळसुटी,
फाकटे, बाभुळसर बुद्रुक, मांडवगण फराटा, म्हसे बुद्रुक, रांजणगांव सांडस, रासाई, वडनेर खुर्द, वढु बुद्रुक, शरदवाडी, शिरुर ग्रामीण, सादलगांव, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भीमा, कोरेगाव भीमा,
काठापुर खुर्द, आमदाबाद, आंधळगाव, आंबळे, उरळगाव, करंजावणे, कर्डेलवाडी, कवठे येमाई, कोंढापुरी, कोळगाव, डोळस, गणेगाव खालसा, जातेगाव बुद्रुक, डोंगरगण, तळेगाव ढमढेरे, दहिवडी, धामारी, निमगाव दुडे, निमगाव भोगी,
निर्वी, पारोडी, बाभुळसर खुर्द, बुरंजवाडी, भांबर्डे, मलठण, दरेकरवाडी, माळवाडी, मुखई, वरुडे, वाघाळे, विठ्ठलवाडी, शिंदोडी, शिरसगाव काटा, सविंदणे, सणसवाडी, धानोरे, नागरगाव, डिग्रजवाडी ही गावे बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
शिरुर तालुक्यातील सर्व बिबट प्रवण क्षेत्रात वनविभागाच्या माध्यमातून मानव व बिबट संघर्ष कमी करण्याबाबत जनजागृती मोहीम सुरु केली असून सर्व ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याचे शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.




