Satara : सातार्यात 72 किलो गुटखा जप्त
Satara

Satara: शासनाची बंदी झुगारून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रकार सातार्यात उघडकीस आला आहे. रविवार पेठेतील एका घरात लपवून ठेवलेल्या या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासन आणि सातारा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल 72 किलो प्रतिबंधित पदार्थ जप्त केले. यावेळी एकूण 1 लाख 43 हजार 729 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रविवार पेठ परिसरातील एका घरात प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर संबंधित पथकाने सोमवारी संशयित घराची झडती घेतली असता घरात मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि पानमसाल्याची पाकिटे साठवून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी तातडीने हा संपूर्ण साठा जप्त केला. या प्रकरणातील संशयित साहिल कोळकर याला कारवाईची चाहूल लागताच घटनास्थळावरून त्याने पळ काढला. त्यामुळे संयुक्त पथकाच्या हाती अवैध माल लागला असला, तरी मुख्य संशयित अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. त्याचा शोध सुरू असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला माल नेमका कुठून आणला जात होता, त्याचे वितरण कोणाला केले जात होते आणि या व्यवहारात आणखी कोण कोण सहभागी आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे.





