Pakistan: पाकिस्तानात ४ हल्ल्यांमध्ये ७० ठार ! बलुचिस्तानमध्ये हल्ल्यांमधील मृतांची संख्या वाढली

Pakistan – पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतात झालेल्या चार हल्ल्यांच्या घटनांमध्ये ७० हून अधिक लोक मारले गेले आहेत. काल झालेल्या काही घटनांमध्ये बलुच बंडखोरांनी ३७ जणांना ठार केले होते. अन्य घटनांमधील मृतांची संख्या मिळून हा आकडा आता ७० पर्यंत वाढता आहे.
लासबेला जिल्ह्यातील बेला या शहरातील एका प्रमुख महामार्गावर वाहनांना लक्ष्य करून केलेल्या मोठ्या हल्ल्यात १४ सैनिक आणि पोलीस कर्मचारी तसेच २१ अतिरेकी ठार झाले.
एका वेगळ्या घटनेत, मुसाखेल जिल्ह्यात सशस्त्र लोकांनी आंतर-प्रांतीय महामार्ग रोखल्याने किमान २३ लोक ठार झाले. हल्लेखोरांनी ट्रक आणि बसमधून प्रवाशांना उतरवले, त्यांची ओळख तपासली आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला. ठार झालेले सर्व पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रहिवासी आहेत.
कलातमध्ये पोलिस चौकी आणि महामार्गावर झालेल्या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह दहा जण ठार झाल्याची माहिती आहे. काल बोलान शहरातील रेल्वे पुलावर झालेल्या स्फोटानंतर क्वेट्टाकडे जाणारी रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली होती. रेल्वे पुलावरील हल्ल्याच्या ठिकाणाजवळ पोलिसांना सहा अनोळखी मृतदेह सापडले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला असून देशातून दहशतवीदाचे उच्चाटन करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला आहे.
ज्यांचा पाकिस्तानवर आणि पाकच्या संविधानावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. मात्र शत्रूंशी आणि दहशतवाद्यांशी चर्चा केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
बलुचिस्तानमध्ये दुहेरी धोका…
नैऋत्य पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात अनेक वर्षांपासून अशांतता आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या भागात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. बलुचिस्तानला प्रतिबंधित तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुच दहशतवाद्यांकडून दुहेरी धोका आहे.





