इंफाळ – मणिपूर येथील नोनी जिल्हयात सहलीला निघालेल्या एका स्कूल बसला झालेल्या अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 25 हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थंबलून उच्च माध्यमिक विद्यालयाची वार्षिक सहल खौपुम येथे गेली असताना ही दुर्घटना घडली. हा अपघात लोंगसाई तुबुंग गावाजवळ विष्णुपूर-खोपम मार्गावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस उलटून घडला. या भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
जखमी विद्यार्थ्यांना बिष्णुपूर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून इंफाळमधील राज मेडिसिटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक त्याठिकाणी तत्काळ रवाना झाले. या संबंधित घटनेची पोलीस अधिक तपासणी करत आहेत.
Pakistan : भारतातून 89 हिंदू यात्रेकरू ‘या’ कारणासाठी पोहोचले पाकिस्तानात
दरम्यान, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची, तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर केली आहे.