चेंबूरमधील अग्नितांडवाच्या घटनेत 7 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री शिंदेंकडून आर्थिक मदतीची घोषणा

CM Eknath Shinde | मुंबईतील चेंबूर परिसरातील सिद्धार्थनगर येथे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे सव्वा पाच वाजेच्या दरम्यान आग लागली. गुप्ता परिवारातील सात लोकांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
सरकार या पीडित कुटुंबासोबत असून मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मयताला प्रत्येकी पाच लाख रुपये, अशी एकूण 35 लाखांची मदत शासनाच्या वतीने दिली जाईल. तसेच जे जखमी आहे त्यांचा शासनाच्या वतीने योग्य तो वैद्यकीय उपचार केला जाईल. तसेच अशा घटना पुन्हा राज्यात होऊ नये, यासाठी शासन योग्य ती काळजी घेईल. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, रविवारी पहाटे पाचच्या दरम्यान ही आग लागली. घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर ही आग संपूर्ण घरात पसरत गेली. या दुमजली घरात गुप्ता कुटुंबिय राहत होते. पहाटे साखर झोपेत असताने आग लागल्याने कोणालाच काही समजू शकले नाही. यात तीन लहान मुलं आणि दोन पुरुष आणि दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला. CM Eknath Shinde |





