पुणे जिल्हा | एकट्या वाघोलीत 60,694 मतदार

वाघोली, (प्रतिनिधी)- शिरूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (13 मे) होणार्या मतदानामध्ये वाघोलीतील 60,694 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 33816 पुरुष, 26872 महिला तर 6 तृतीयपंथी मतदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये 37643 मतदार होते.
तर साडेचार वर्षात ऑनलाइन, मतदार नोंदणी अभियानात 23,051 नवीन मतदार वाघोलीच्या मतदार यादीत जोडले गेले आहेत. त्याचबरोबर 24 मतदान केंद्रांमध्ये वाढ झाली असून एकूण 59 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदार संख्या असणार्या वाघोली गावामध्ये 60,694 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्यामुळे निवडणुकीत वाघोलीवर विशेष लक्ष असणार आहे. ऑनलाइन, मतदार नोंदणी अभियानात साडेचार वर्षामध्ये 23051 नवीन मतदार वाढले आहेत.
वाघोलीत सोमवारी (दि. 13) होणार्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून जवळपास 450 कर्मचारी यासाठी कार्यरत राहणार आहेत. वाघोलीत मतदान प्रक्रिया सातव हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा येथेच पार पाडली जात होती.
या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढली असल्याने यावेळी सातव हायस्कूल, वाघोली जिल्हा परिषद शाळेसह, बीजेएस कॉलेज, सातव ज्युनिअर कॉलेज, अंगणवाड्या, उबळेनगर जिल्हा परिषद शाळा याठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. निवडणूक यंत्रणा मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी याठिकाणी काम करीत आहे.





