Voter List Revision – तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मतदार याद्यांचे सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, बांधकाम समिती सभापती सुदाम शेळके, स्वच्छता व जलनिस्सारण समिती सभापती निखिल भगत, महिला व बालकल्याण सभापती शैलाजा काळोखे, उपसभापती शोभा परदेशी आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी उपस्थित सर्व नगरसेवकांना मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व बीएलओ यांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. यावेळी शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावत प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात शनिवार (दि. ११) व रविवारी (दि. १२) कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार नोंदणी व पुनर्निरीक्षण कॅम्प सरस्वती विद्यामंदिर, एम.आय.टी कॉलेज, इंद्रायणी महाविद्यालय, संत ज्ञानेश्वर शाळा, आदर्श शाळा, परांजपे शाळा, सेंट अँड स्कूल, सह्याद्री विद्यालय, बालविकास शाळा, नथुभाऊ भेगडे शाळा क्र. १, वीर जिजामाता शाळा, सुभाष मार्केट, कैकाडी समाज मंदिर, जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित केले आहेत.