दक्षिण आफ्रिकेत हिंदू संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम; तब्बल 60 हजार हनुमान चालिसांचे केले वाटप

Hanuman Chalisa distributed in South Africa | दक्षिण आफ्रिकेतील एका प्रमुख हिंदू संघटनेने देशभरातील 8 मंदिरांमध्ये हनुमान चालिसाच्या 60 हजार लहान प्रतींचे वाटप केले आहे. ‘एसए हिंदूज’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेमधील ग्वातेंग प्रांतातील विविध क्लबने हनुमान चालिसाचे वाटप केले. यासोबतच, त्यांनी गरजूंना वाटप करण्यासाठी सुमारे दोन टन किराणा सामान देखील जमा केला.
या उपक्रमाबद्दल बोलताना संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की, मंदिरांमध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हे कार्य यशस्वी झाले. लोकांच्या मदतीसाठी त्यांनी अन्नधान्याचे वाटप देखील केले.
‘एसए हिंदूज’च्या संस्थापिका पंडिता लूसी सिगबन यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक आले आणि विशेषतः क्वाझुलू-नताल (केझेडएन) सारख्या जवळच्या प्रांतातील लोकांनीही या उपक्रमाला मोठ्या उत्साहाने पाठिंबा दर्शवला. हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.”
दक्षिण आफ्रिकेतील हिंदू समुदायाने यापूर्वी ऑगस्ट 2024 ला भक्तिमय उत्सवाच्या दरम्यान ‘शेरेनो प्रिंटर्स’ आणि ‘इलेक्ट्रो ऑनलाइन मीडिया’ यांच्या भागीदारीत 10 लाख हनुमान चालिसाच्या प्रती वितरित करण्यास सुरुवात केली होती. 2029 पर्यंत हनुमान चालिसाच्या 10 लाख प्रतींचे वितरण पूर्ण करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना शेरेनो प्रिंटर्सचे प्रमुख नीरन सिंह यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील हिंदू बांधवांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोच वाढवण्यासाठी ते पूर्णपणे सहकार्य करत आहेत. अशा उत्साही कार्यांमुळे आपला समुदाय एकत्र येतो.
यापूर्वी, काही वर्षांपूर्वी जोहान्सबर्गमध्ये 12 तासांच्या भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देश-विदेशातील गायकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमातील हनुमान चालिसाचे गायन विशेष ठरले होते. ‘एसए हिंदूज’ संघटनेचे त्यांच्या कार्यासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.





