स्वातंत्र्यदिनानिमित्त म्यानमारमध्ये 6 हजार कैद्यांची सुटका

6000 prisoners released in Myanmar – म्यानमारमधील लष्करी शासनाने देशातल्या तुरुंगांमधून जवळपास ६ हजार कैद्यांची सुटका केली आहे. तर इतर अनेक कैद्यांची शिक्षाही कमी करण्यात आली आहे. देशाला ७७ वर्षांपुर्वी ब्रिटनकडून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त कैद्यांच्या शिक्षेमध्ये सूट देण्यात आली आहे.
तुरुंगातून सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये राजकीय कैद्यांचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. लष्कराने फेब्रुवारी २०२१ मध्ये आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सत्ता ताब्यात घेतल्यानंतर विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांपैकी काही कैद्यांचीच सुटका करण्यात आली आहे.
लष्करी सरकारचे प्रमुख, वरिष्ठ जनरल मिन आंग हलाईंग यांनी म्यानमारमधील ५,८६४ कैद्यांना माफी दिली, तसेच १८० परदेशी कैद्यांना मूळ देशी परत पाठवले जाईल, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सुटका करण्यात आलेल्या कैद्यांनी जर कायद्याचा भंग केला, तर त्यांना उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
मिन आंग हलाईंग यांनी १४४ कैद्यांची जन्मठेपेची शिक्षा १५ वर्षांच्या तुरुंगवासात बदलली आहे. मात्र या कैद्यांबाबत कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. याशिवाय स्फोटक पदार्थ कायदा, बेकायदेशीर संघटना कायदा, शस्त्र कायदा आणि दहशतवादविरोधी कायदा, लष्करी राजवटीच्या विरोधकांविरुद्ध वापरले जाणारे सर्व कायदे वगळता इतर सर्व कैद्यांची एक षष्ठांश शिक्षा कमी केली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. कैद्यांची सुटका शनिवारी सुरू झाली परंतु प्रक्रिया पूर्ण होण्यास काही दिवस लागू शकतात.





