पुणेकरांचे 6 हजार कोटी रु. ‘पाण्यात’ जाणार?

पुणे –मुळा-मुठा नद्यांचे नाव पुढे करत भाजपने 1,500 कोटी रुपये खर्चाचा नदीसंवर्धन प्रकल्प (जायका) प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. यानंतर नदी शुद्ध होण्याचा दावा करत तब्बल 4,600 कोटींचा नदीकाठ विकसन प्रकल्प पुणेकरांचे तब्बल 6 हजार कोटी रुपये पाण्यात घालविणारा ठरण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आणि घाईगडबडीने राबविण्यात येणाऱ्या “जायका’ प्रकल्पात शहराची वाढलेली हद्द, सांडपाणी तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीतून मुळा नदीतून संगमानंतर येणारे सांडपाणी याचा विचार या प्रकल्पात करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पात केवळ मुठा नदीच आणि तीसुद्धा काही प्रमाणातच स्वच्छ होणार आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्याचे स्वप्न दाखवत भाजपकडून नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यात येणार आहे, तो दिखाऊपणाचा ठरणार आहे. मुळा नदीतून येणाऱ्या अशुद्ध पाण्याचे नियोजन काय, याचे उत्तर महापालिका प्रशासन अथवा भाजप पदाधिकाऱ्यांकडे नाही.
फक्त महापालिका हद्दीचा विचार
शहरात निर्माण होणाऱ्या केवळ 850 एमएलडी सांडपाण्याचा विचार नदी संवर्धन प्रकल्पात करण्यात आला आहे. प्रत्यक्षात शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत सरासरी 1100 ते 1200 एमएलडी सांडपाणी निर्माण होते. तर, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये जवळपास 100 ते 150 एमएलडी सांडपाणी तयार होते. हे वाढीव सांडपाणी नाले तसेच ओढयातून पुन्हा मुठा नदीतच येते. नदी सुधारणा प्रकल्पात शहराच्या जुन्या हद्दीतील सांडपाणी संकलित करून त्यावर प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे या योजनेत केवळ 850 एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया होईल. त्यानंतरही सुमारे 300 ते 400 एमएलडी सांडपाणी नदीत येणार आहे. या प्रकल्पात मुळा नदीचाही समावेश असला, तरी महापालिका मुळा नदीवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड हद्दीतील मुळा नदीतून येणारे सांडपाणी हे संगमाच्या ठिकाणी येणार आहे. पुढे ते शुद्ध केलेल्या पाण्यात मिसळणार आहे.
नदीकाठांचे विकसनही नावालाच
नद्या स्वच्छ होणार असल्याचे कागदावर दाखवत भाजपने पुणेकरांच्या माथी साडेचार हजार कोटींचा नदीकाठ विकसन प्रकल्प मारला आहे. त्यात नद्या स्वच्छ झाल्यानंतर दोन्ही काठ विकसित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्याच्या 215 कोटींच्या निविदेलाही नुकतीच मान्यता देणात आली आहे. त्यात, संगमवाडी ते बंडगार्डनपर्यंत नदीचे दोन्ही काठ विकसित करून पर्यटन स्थळ विकसित केले जाणार आहे. पण, प्रत्यक्षात संगमाच्या ठिकाणीच स्वच्छ झालेले मुठा आणि कोणतीही प्रक्रिया न केलेले मुळा नदीचे पाणी एकत्र होणार आहे.
त्यामुळे संगमवाडी ते बंडगार्डन भागातील पाणी स्वच्छ कसे? असा प्रश्न आहे. त्यातच महापालिकेने केंद्राच्या “जेएनएनयूआरएम’ अंतर्गत संगमवाडी ते बंडगार्डन परिसरात जवळपास 100 कोटींचा खर्च करून नदीकाठ विकसनाची बहुतांश कामे केली आहे. ही कामे उखडून पुन्हा नव्याने 215 कोटींचा खर्च पुणेकरांच्या माथी मारला जाणार आहे, अशी चर्चा आहे.
दिखाऊपणाचा प्रकल्प
मुळा नाही, तर फक्त मुठा नदीच होणार स्वच्छ
मुळातच हे दोन्ही प्रकल्प चुकीच्या पद्धतीने आणण्यात आले आहेत. प्रत्यक्षात “जायका’ प्रकल्प 2016 मध्ये मंजूर झाला. त्यावेळीसांडपाणाचे प्रमाण कमी होते. त्यानंतर गेल्या सहा वर्षांत शहरातील सांडपाणी 40 टक्के वाढले आहे. त्यामुळे हा प्रकल्पच अर्धवट आहे. शिवाय केवळ मुठा नदीतील पाणी स्वच्छ होणार असून, मुळा नदीतून संगमापासून पुन्हा अस्वच्छ पाणी मुठा नदीत मिसळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्पच फसणार असून, केवळ निवडणुकांच्या तोंडावर पुणेकरांच्या पैशांची ही उधळपट्टी ठरणार आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच.
मुठा नदीव्यतिरिक्त जे काही पाणी नदीत येणार आहे, ते थेट पंपिंग करण्याबाबत विचार सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा नदीतूनही येणारे पाणी मुठा नदीत जाण्यापूर्वी पंपिग करण्याबाबत विचार सुरू आहे.
– गणेश बिडकर, सभागृह नेते, महापालिका





