कोरेगाव मतदारसंघातील रस्त्यांसाठी 55 कोटी

कोरेगाव – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव, सातारा आणि खटाव तालुक्याच्या भागांमधील रस्त्यांच्या विकासासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे तब्बल 55 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. या निधीतून खेड्यापाड्यातील रस्ते काँक्रिटचे होणार आहेत.
ना. शिंदे म्हणाले, मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमध्ये संशोधन आणि विकास अंतर्गत 55 कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेही सहकार्य लाभले.
कोरेगाव तालुक्यातील धुमाळवाडी-खडखडवाडी रस्त्यासाठी एक कोटी 75 लाख 81 हजार, कोरेगावनजीक तडवळे संमत कोरेगाव येथील बाग वस्ती रस्ते मार्गाने जोडणार्या जळगाव-बाग वस्ती-चांदवडी या रस्त्यासाठी तीन कोटी 87 लाख 12 हजार, किन्हई-रामोशी वस्ती रस्त्यासाठी 5 कोटी 16 लाख एक हजार, तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे खुर्द-भांडेवाडी-आसनगाव रस्त्यासाठी पाच कोटी तीन हजार, भाडळे खोर्यातील शेंदुरजणे-अनभुलेवाडी रस्त्यासाठी चार कोटी 38 लाख 74 हजार, सातारा तालुक्यातील वर्णे-वडाळवाडी रस्त्यासाठी 3 कोटी दोन लाख, खटाव तालुक्यातील खटाव-भांडेवाडी-खातगुण रस्त्यासाठी पाच कोटी 37 लाख 66 हजार, प्रजिमा क्र. दहा ते दरजाई पोहोच रस्त्यासाठी एक कोटी 68 लाख नऊ हजार, दरुज-कदम वस्ती-बेंद वस्ती ते खटाव तालुका हद्दीपर्यंत रस्त्यासाठी तीन कोटी 25 लाख चार हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बुध-नागनाथवाडी रस्त्यासाठी चार कोटी 13 लाख 93 हजार, बुध-पांगरखेल रस्त्यासाठी दोन कोटी 70 लाख 76 हजार, बुध-फडतरवाडी रस्त्यासाठी तीन कोटी 43 लाख 89 हजार, विसापूर-रेवलकरवाडी रस्त्यासाठी सहा कोटी 43 लाख 41 हजार, विसापूर-बुधावलेवाडी रस्त्यासाठी चार कोटी 81 लाख 75 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
देऊर-कोरेगाव-रहिमतपूर रस्ता चौपदरीकरणास लवकरच प्रारंभ
मतदारसंघातील सर्वांत वर्दळीच्या खंडाळा-शिरोळ राज्यमार्गाचे देऊर-कोरेगाव-रहिमतपूर असे चौपदरीकरण केले जात आहे. पिंपोडे खुर्द येथील दोस्ती ढाब्यापासून या कामास सुरुवात होत असून, पळशी, कोलवडी, भक्तवडी, सातारारोड, जळगाव, भाकरवाडी, कोरेगाव शहर, न्हाळेवाडी, एकसळ, शिरंबे, वेलंग, निगडी-रंगनाथस्वामींची या गावांसह राज्यमार्गावरील आणि लगतच्या गावांना याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर सांगली, मिरज व कर्नाटकात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलबध होणार आहे. कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांसाठी महत्त्वाच्या या राज्यमार्गाच्या कामाचा लवकरच प्रारंभ केला जाणार असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.





