राज्यातील ५४ नद्या प्रदूषणाच्या विळख्यात; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल जाहीर

मुंबई – राज्यातील ५४ नद्या प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नद्यांच्या स्वच्छतेबाबतच्या या अहवालानुसार नीरा मध्यम प्रदूषित, कोयना, कृष्णा, वेण्णा सर्वसाधारण प्रदूषित, तर उरमोडी आणि पंचगंगा साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक नद्यांचा या यादीत समावेश आहे.
देशभरातील नद्यांतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ‘नॅशनल वॉटर क्वॉॅलिटी मॉनिटरिंग प्रोगाम राबवत असते. पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण किती आहे? यावर पाण्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी मंडळाकडून नद्यांतील पाण्याचे नमुने गोळा करत प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर नद्यांचा प्रदूषित पट्टा ठरवला जातो.
नद्यांतील पाण्यांचे नमुने गोळा केले जातात. त्यात फिजिओ केमिकल, बॅक्टेरिओलॉजिकल, मेटल्स आणि पेस्टीसाइड्सच्या मापदंडाच्या आधारे प्रदूषण ठरवले जाते. पाण्यातील प्राणवायूचे आवश्यक प्रमाण गृहित धरले जाते.
त्यानुसार नद्यांची श्रेणीनिहाय वर्गवारी केली जाते. सर्वाधिक प्रदूषित नद्यांना उपाययोजनेनुसार प्राधान्यक्रम दिला जातो. धोकादायक प्रदूषित, अत्याधिक प्रदूषित, मध्यम प्रदूषित, सर्वसाधारण प्रदूषित आणि साधारण प्रदूषित असे पाच प्राधान्यक्रम आहेत.
या अहवालात कुरुंदवाड येथे गणपती घाटावर कृष्णा ही सर्वसाधारण प्रदूषित आणि इचलकरंजी परिसरातील शिरदवाड येथे एमआयडीसीत इनटेक वेल येथील पंचगंगा नदीत सांडपाणी थेट मिसळत असल्यामुळे ही जागा साधारण प्रदूषित नद्यांच्या यादीत समाविष्ट झाल्या आहेत.
दरम्यान, देशभरात प्रदूषित नद्यांची संख्या किंचित कमी झाली असली तरी महाराष्ट्र मात्र या शर्यतीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. देशभरात प्रदूषित नद्यांची संख्या ३११ वरून २९६ वर आली असली, तरी त्यातील ५४ नद्या महाराष्ट्रातील असणे ही राज्यासाठी मोठी चिंतेची बाब मानली जात आहे.
सर्वसाधारण प्रदूषित : क-हाड येथे कोयना, सातारा ते कुरुंदवाड मार्गावरील गणपती घाट येथी कृष्णा, महाबळेश्वर ते माहुली मार्गावर कृष्णा साधारण प्रदूषित : इचलकरंजी परिसरातील शिरदवाडजवळ एमआयडीसी इनटेक वेल येथे पंचगंगा, सातारा ते नागठाणे केटीवेअर येथे उरमोडी आणि पोफळीजवळ वशिष्ठी.





