सरन्यायाधीशांच्याच नावाने मागितले ५०० रूपये; सोशल मीडिया हँडलरच्या विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाने पैसे मागितल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाच्या युनिटने एका सोशल मीडिया हँडलरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात एका वकिलाने एक्सवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सरन्यायाधीशांचे या तोतयेगीरीकडे लक्ष वेधले गेले.
संबंधित वकिलाच्या पोस्टनुसार स्वत:ला भारताचा सरन्यायाधीश भासवणाऱ्या तोतयाने कॅबसाठी ५०० रूपये ट्रान्सफर करण्याची विनंती पाठवली होती. या घटनाक्रमाशी संबंधित उपलब्ध माहितीनुसार एक्सच्या एका वापरकर्त्याला एक मेसेज आला.
त्यात असे लिहिले होते की हॅलो, मी सरन्यायाधीश (सीजेआय) आहे. आमच्या कॉलेजीयमची एक तातडीची बैठक आहे आणि कॅनॉट प्लेस येथे अडकलो आहे. तूम्ही मला ५०० रूपये पाठवू शकता? मी न्यायालयात पोहोचल्यावर तुमची रक्कम परत करेन.
संदेश पाठवणाऱ्याच्या फोटोत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा फोटो दिसत होता. फसवणुकीचा हा नवा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सायबर सेलकडे याबाबत तक्रार केली आहे. तपास सुरू असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
काय आहे केंद्राचा अहवाल
सायबर ठकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली असून या स्वरूपाच्या गुन्ह्याद्वारे रोजच फसवणुकीच्या घटना देशाच्या विविध भागांत घडत आहेत. केंद्र सरकारनेही लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
सरकारने सादर केलेल्या अहवालानुसार २०२२-२३ या वर्षात उत्तर प्रदेशात सायबर फसवणुकीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तब्बल दोन लाख लोकांना अशा प्रकरणांत फसवण्यात आले. त्यातून भामट्यांनी ७२१.१ कोटी रूपयांची लूट केली आहे.
त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत असे सायबर गुन्हे घडले आहेत. उत्तर प्रदेशातील वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्यातील १६ जिल्ह्यांत सायबर ठाणी सुरू करण्यात आली आहेत. हे गुन्हे रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना रोखण्याचे आणि ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील फसवणुकीच्या प्रकरणांचा विचार केला गेला तर देशभरात सायबर फसवणुकीचे ११.२८ लाख गुन्हे समोर आले आहेत.





