Iran-Israel War News : सौदीमध्ये अडकले 50 हजार राज्यातील मुस्लिम बांधव.! सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी हालचाली सुरु
हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद सरकारकडे अधिकृतपणे होत असते, मात्र उमरा या विधीसाठी जाणाऱ्यांची कोणतीही केंद्रीकृत नोंदणी होत नाही.

Iran-Israel War News – रमजान काळात मक्का-मदीना येथे उमरा या धार्मिक विधीसाठी राज्यातून सौदी अरेबियात गेलेले 50 हजार ते एक लाख मुस्लिम बांधव अडकले असल्याची भीती राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी राज्यातून सुमारे 500 टूर ऑपरेटर्सनी या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना पाठवले आहे. यापैकी केवळ मुंबईतूनच 100 हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय असल्याची माहिती आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाने तातडीने हालचाली सुरू करत सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद सरकारकडे अधिकृतपणे होत असते, मात्र उमरा या विधीसाठी जाणाऱ्यांची कोणतीही केंद्रीकृत नोंदणी होत नाही. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामुळे नेमका आकडा सांगणे कठीण होत असल्याचे आयोगाने सांगितले आहे.
सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांची संख्या स्पष्ट करण्यासाठी सर्व टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत नेमकी संख्या स्पष्ट होईल, असे प्यारे खान यांनी सांगितले.
यासंदर्भात आयोग राज्य सरकारच्या संपर्कात असून सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करावी. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.






