Ladies Special bus delhi : दिल्लीत महिलांसाठी धावणार ५० लेडीज स्पेशल बसेस
दिल्लीतील महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Ladies Special bus delhi – दिल्लीतील महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली परिवहन महामंडळ लवकरच आपल्या ताफ्यात सुमारे ५० नवीन लेडीज स्पेशल बसेसचा समावेश करणार आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.
पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत या ५० विशेष बसेस सुरू केल्या जाणार आहेत. महिलांच्या गरजेनुसार या बसेसचे दोन मुख्य विभागांत वर्गीकरण करण्यात आले आहे.
यातील २५ बसेस विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींना केंद्रस्थानी ठेवून यू-स्पेशल म्हणून चालवल्या जातील. उर्वरित २५ बसेस दिल्लीच्या बाहेरील भागांमध्ये तैनात केल्या जातील, जिथे महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे.
परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बसेसमध्ये केवळ महिलांनाच प्रवासाची परवानगी असेल. यापूर्वीही दिल्लीत काही लेडीज स्पेशल बसेस चालवल्या जात होत्या.
मात्र आता अधिक सुनियोजित पद्धतीने या सेवेचा विस्तार केला जात आहे. नवीन बसेसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी अद्ययावत फीचर्स समाविष्ट केले जाणार आहेत.
महिला प्रवाशांची सर्वाधिक गर्दी कोणत्या मार्गांवर असते, हे शोधण्यासाठी सरकार सध्या सहेली पिंक स्मार्ट कार्ड आणि पिंक तिकीट यांच्या वापराचा डेटा विश्लेषणाद्वारे अभ्यास करत आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, या सर्व नवीन बसेस लो-फ्लोअर आणि वातानुकूलितअसून, दिव्यांग व्यक्तींसह सर्वच प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ प्रवास मिळावा या दृष्टीने त्यांची रचना करण्यात आली आहे.





