ओझर : योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे यांनी सेवेतून निवृत झाल्यानंतर शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शेतीकडे विशेष लक्ष देऊन उसाचे एकरी 110 टन उत्पादन घेतले आहे. उसाला सुमारे 50 च्या जवळपास कांडे लागले आहेत. मोरे यांनी आपल्या एक हेक्टर क्षेत्रात जून 2023 मध्ये 86032 या वाणाच्या आडसाली उसाच्या कांड्याची सरी पद्धतीने लागवड केली. मोरे यांच्या एक हेक्टर क्षेत्रातील उसाची नुकतीच तोडणी झाली आहे. एक हेक्टर क्षेत्रातील 313 टन ऊस येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास गेला आहे. एका उसाचे वजन चार ते पाच किलो आहे. लागवडी पूर्वी एकरी तीन ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर वाढीसाठी रासायनिक खते व औषधांच्या चार ते पाच फवारण्या केल्या. विहिरीवरून वरून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली. पाण्यामधून जिवाणू खते दिली त्यामुळे उसाची चांगली वाढ झाली, शिरोली खुर्द येथील माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य सुभाष सीताराम मोरे यांनी ऊस पिकासाठी पिकासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ऊस लागवडीपासून योग्य व्यवस्थापन केल्याने उसाची चांगली वाढ होण्यास मदत झाली. शेतीची आवड असल्याने निवृत्तीनंतर शेती करण्याचा निर्णय घेतला तो यशस्वी ठरला असल्याचे मोरे यांनी सांगितले