जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

मुंबई – जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, अशी माहिती दिली आहे.
लोणावळ्याजवळील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
दरम्यान, या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या आणि जखमींना शासकीय खर्चातून वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही दिले. यावेळी त्यांनी अपघातानंतर तातडीने मदतकार्य केल्याबद्दल हायकर्स आणि आयआरबी टीमचे कौतुक केले.
नेमका कसा झाला अपघात ?
लोणावळ्याजवळील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 लोक जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील प्रवासी होते. पुण्याचा कार्यक्रम संपवून ते गोरेगाव येथे जात असताना हा अपघात घडला आहे.





