लातूरमध्ये पावसाचे ५ बळी; ४० तासांनंतर सापडले मृतदेह

लातूर : लातूर जिल्ह्यात काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. यामुळे तिरू नदीला आलेल्या पूरात २७ वर्षीय तरुण वाहून गेला होता. तसेच रात्री ओढ्यातील पुलावरून पाणी वाहत असल्याने ऑटोने प्रवास करणारे पाच जण वाहून गेले होते. त्यापैकी तिघे बचावले. मात्र, उर्वरित दोघे गायब झाले होते. तसेच उदगीर येथेही दोन जण वाहून गेले होते. वाहून गेलेल्या पाच जणांचे मृतदेह तब्बल ४० तासांच्या शोध कार्यानंतर सापडले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाने हाहाकार उडाल. यावेळी सुदर्शन घोनशेट्टी हा तरुण शेतातून परतत असताना तिरू नदीत बुडाला तर त्याच दिवशी जळकोट तालुक्यात पुलावरून पाणी वाहून गेल्याने रिक्षातील पाच जण जोरदार प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी तिघांना नंतर वाचवण्यात आले, तर इतर दोघे बेपत्ता होते. ही घटना रात्री ८ वाजता घडली तेव्हा ऑटोरिक्षा मल्हिप्परगा येथे जात होती, असे माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यानंतर ४० तासांच्या शोध मोहिमेनंतर सुदर्शन घोनशेट्टी, ऑटोरिक्षा चालक संग्राम सोनकांबळे आणि प्रवासी विठ्ठल गवळे यांचे मृतदेह सापडले. तसेच उदगीर येथील वैभव गायकवाड (२४) आणि संगीता सूर्यवंशी यांचे मृतदेह सापडले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी बचाव कार्यात सहभाग घेतला, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेती पिकांची दाणादाण उडाली आहे. नदीकाठच्या शेतीस तलावाचे स्वरूप आले आहे, तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे वाहून जाणाऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देऊन वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास ४८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.





