Banking : बॅंकांमध्ये 5 दिवसांच्या आठवड्याबाबत मोठं पाऊल! IBA कडून उच्चस्तरीय समितीची स्थापना
Banking : देशात 5 दिवस बँकिंग लागू करण्याबाबत IBA ने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. शनिवार-रविवार बँक शाखा बंद राहिल्यास ग्राहकांवर काय परिणाम होईल जाणून घ्या.

Banking : देशातील बँकांमध्ये आठवड्यातून पाच दिवस कामकाज करण्याच्या मागणीवर महत्त्वाची हालचाल झाली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) २९ सप्टेंबर २०२६ रोजी पाच दिवसांच्या बँकिंगच्या अंमलबजावणीबाबत अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक आहेत.
बँकिंग क्षेत्रात पाच दिवस कामकाजाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. २७ सप्टेंबर रोजी IBA ची वाटाघाटी समिती, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) आणि बीकेएसएम यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या समितीच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला.
या समितीत बँक व्यवस्थापन तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अशोक चंद्रा यांची समितीचे पर्यायी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या बँकांना महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र, पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार बँकांचे कामकाज सुरू असते. पाच दिवसांचा प्रस्ताव लागू झाल्यास शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बँक शाखा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यावेळी ग्राहकांना शाखेतील कामांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसांचा वापर करावा लागेल.
मात्र, शाखा बंद असल्या तरी डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि इतर डिजिटल सुविधा ग्राहकांना उपलब्ध राहतील.
या समितीकडून पाच दिवसांच्या बँकिंगसाठी आवश्यक कार्यपद्धती आणि इतर बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर समितीच्या शिफारशी वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पाच दिवसांचे बँकिंग तातडीने लागू झालेले नसून, त्याबाबतची प्रक्रिया पुढे सुरू झाली आहे.
ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे?
पाच दिवसांचे बँकिंग लागू झाल्यास शनिवार-रविवार शाखांमध्ये प्रत्यक्ष कामकाज करता येणार नाही. त्यामुळे रोख व्यवहार, कागदपत्रे किंवा शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून करावयाची कामे सोमवार ते शुक्रवार या काळात करावी लागतील. डिजिटल सेवा मात्र सुरू राहण्याची शक्यता आहे.
टीप : पाच दिवसांचे बँकिंग अद्याप लागू झालेले नाही. अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीची तारीख संबंधित प्राधिकरणांच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल.






