मागासवर्गीय वस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी

आमदार महेश शिंदे यांची माहिती; न्याय व विशेष सहाय्य मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून मान्यता
पुसेगाव : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी निधी आणण्याची परंपरा आमदार महेश शिंदे यांनी कायम ठेवली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री सुरेश खाडे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. त्याचबरोबर या विषयासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरेगाव तालुक्यासाठी एक कोटी 95 लाख रुपये मंजूर झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक सातारारोडसाठी एक कोटी 10 लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. प्रमुख चौकापासून ते बौध्द वस्तीकडे जाणारा रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण आणि बंदिस्त गटारांसाठी हा निधी वापरात येईल. बौध्द वस्तीमध्ये रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटर बांधण्यासाठी एकंबे व शिरंबे येथे प्रत्येकी 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत. शिरंबे येथे बौध्द वस्तीसह मातंग वस्तीचा देखील समावेश आहे.
त्याचबरोबर चिमणगाव, भोसे व अंबवडे संमत कोरेगाव येथील बौध्द वस्तीसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.खटाव तालुक्यासाठीही एक कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले असून, त्यामध्ये सर्वाधिक खटावसाठी 80 लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
खटाव येथे प्रमुख बौध्द वस्ती आणि मातंग वस्तीकडे जाणारा रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारे केली जातील. बुध येथे बौध्द वस्ती आणि मातंग वस्तीकडे जाणारा रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरणासाठी 30 लाख रुपये तर वेटणे येथे बौध्द वस्तीकडे जाणारा रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. सातारा तालुक्यासाठी एक कोटी 95 लाख रुपये मंजूर झाले असून, त्याअंतर्गत संभाजीनगरमध्ये मागासवर्गीय वस्ती वॉर्ड क्रमांक चार आणि पाचमधीलदेगाव रस्त्यापासून ते जिल्हा परिषद शाळा, विक्रांतनगर पर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण, बंदिस्त गटारे होणार आहेत. खेड येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी 45 लाख रुपये मंजूर झाले आहेत. गोजेगाव बौध्द वस्तीमध्ये रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटारांसाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महागाव येथेही 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.





