मोठी बातमी! खेड-शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटींची रोकड जप्त; बड्या नेत्याचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

खेड-शिवापूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. या वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. जवळपास 5 कोटींची रक्कम असल्याचा अंदाज आहे. ही रक्कम कोणाची? कुठे चालवली होती? आदीबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलिस चौकीला आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सध्या खेड-शिवापूर पोलिस चौकीत वरिष्ठ पोलिस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रककमेची शहनिशा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, शहाजी नलावडे असे गाडीतून ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीचे नाव आहे. तो महायुती सरकारमधील बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया –
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!
हे आमदार कोण?
काय झाडी…
काय डोंगर….
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले
१५ कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..
किती हे खोके?
@ECISVEEP
@AmitShah
pic.twitter.com/tb7DuPWV3W— Sanjay Raut (@rautsanjay61) October 21, 2024





