४७ वर्षांपूर्वी प्रभात: श्रम व विद्या यांची सांगड – कविवर्य बा. भ. बोरकर

पुणे – कविवर्य बा. भ. बोरकर म्हणाले, आपल्याकडे संस्कृती व शेती (श्रमाचे प्रतीक) यात कल्चर व ऍग्रिकल्चर यात दुरावा निर्माण झाला आहे. विद्या-संस्कृतीला जोड श्रमाची पाहिजे. अमेरिकेत वयाच्या 14 वर्षी विद्यार्थी स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहतो. हा आत्मविश्वास श्रमप्रतिष्ठेने येतो. आपल्याकडे विद्यार्थी नापास झाल्याबरोबर निराश होतो; आत्महत्येकडेही वळतो. विद्यार्थ्यांमध्ये जे उत्कृष्ट असेल त्याची दखल अमेरिकत घेतली जाते. आपल्याकडील शिक्षण त्याला पेचात टाकते; निष्क्रिय बनवून सोडते. विद्वानांबद्दलही तेच म्हणता येईल. “यः क्रियावान सः पंडितः’ हे आपलेच पौर्वात्य तत्त्व आपण विसरलो आहोत व केवळ पुस्तकी पंडित शिल्लक राहिले आहेत. अनुभवासाठी साक्षात जीवनाकडेच वळले पाहिजे.
केशवपन कालबाह्य प्रथा – तर्कतीर्थ जोशी
सांगली – विधवेच्या केशवपनाला वेदात आधारच नाही. त्याचबरोबर माझे वैयक्तिक मत, तर केशवपन ही कालबाह्य ठरलेली प्रथा असल्याने सध्याच्या काळात विधवेचे केशवपन करू नये असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सांगितले.
बॅंकेतील अफरातफरींना आळा घालण्यासाठी योजना आखावी
नवी दिल्ली – बॅंकेमध्ये होणाऱ्या वाढत्या अफरातफरींना आळा घालणारी योजना शासनाने तयार करावी अशी मागणी विरोधी पक्ष व कॉंग्रेस पक्षाने आज लोकसभेत केली. बॅंक ऑफ इंडियाने अफरातफर कमी करण्यासाठी निर्दोष यंत्रणा राबविण्यास यापूर्वीच सुरुवात केल्याची माहिती अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी सांगितली. मात्र ही व्यवस्था पुरेशी नाही, असेही त्यांनी सांगितले. यासाठी फिरते पथक मात्र
अपुरे पडेल.



