४७ वर्षांपुर्वी प्रभात: महिलांनो घराच्या बाहेर यावे पंतप्रधानांचे आवाहन

मुंबई – महिलांनी घराच्या बाहेर यावे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्याला काय करता येईल ते पाहावे, असे आवाहन आज पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले. इंदिराजी पुढे म्हणाल्या, भारतात पुरूष व स्त्रिया यांच्यात स्पर्धा कधीच नव्हती व नाही. हे पुढेही चालू राहील अशी मला आशा आहे. स्त्रियांचेही जगात अस्तित्व आहे ही वस्तुस्थिती संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष हे “आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ जाहीर करून मान्य केली याबद्दल मला
आनंद वाटतो.
देशातील नैसर्गिक संपत्तीचा विकासासाठी उपयोग करा
पुणे – देशात उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्तीतजास्त उपयोग देशाच्या विकासासाठी तसेच आर्थिक उन्नतीसाठी कसा करून घेता येईल यादृष्टीने संशोधकांनी व तंत्रज्ञांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले.
दलितांच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी लेखणी झिजवावी
बीड – पत्रकाराची लेखणी समृद्ध जीवन जगण्यासाठी नसून ती ग्रामीण भागातील उपेक्षित दीन, दुबळ्या व दलित जनतेच्या दैनंदिन प्रश्नांसाठी झिजवण्या करता आहे. त्यांचे मन स्वच्छ व संवेदनाक्षम पाहिजे. जात, पंथ, धर्म याची जळमटे झटकून नम्रता अंगी बाणवली पाहिजे, असे विचार संपादक रंगा वैद्य यांनी मांडले.
दुर्लक्षित समाजाच्या रक्षणार्थ उभे राहावे
पुणे – भावनात्मक आंदोलनात न पडता जनतेतील दुर्लक्षित समाजाचे रक्षण करण्यासाठी समाजवादी युवजन सभेने उभे राहण्याचे आवाहन समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले. पुढे ते म्हणाले, नव्या जाणिवा निर्माण करण्याचे कार्य अवघड आहे पण तेच करावयाचे आहे कारण त्यातच पुरुषार्थ आहे व त्यातूनच आपली प्रतिमा निर्माण व्हावी.





