47 वर्षापूर्वी प्रभात : निवडणूक कायद्यात बदल करणारे विधेयक

ता. 20, माहे जून, सन 1975
श्रीनगर – राज्याच्या निवडणुकीच्या पद्धतीत सुधारणा करावी, अशी मागणी करणारे विधेयक आज जम्मू-काश्मीर विधानसभेत कायदेमंत्री डी. डी. ठाकूर यांनी मांडले. निवडणुकीस उभ्या राहणाऱ्या उमेदवारास अनुमदोकाची जरूरी नाही, फेटाळलेल्या उमेदवारी अर्जाची आठ दिवसांत सुनावणी, निवडणुकांवर स्थगिती आज्ञा व खास कोर्टाच्या हुकूमाविरूद्ध वरच्या कोर्टात जाण्यास परवानगी नसावी. अशा सूचना या विधेयकात आहेत. या विधेयकात किरकोळ बदल झाल्यावर ते मान्य झाले. सार्वमत आघाडीच्या नेत्यांना निवडणूक लढण्यास पूर्वी बंदी घालण्यात आली होती. त्यातही बदल करण्यात आला.
अज्ञान दूर झाल्याखेरीज शिक्षणाचा उपयोग नाही
पुणे – जातीयता व अज्ञान संपूर्ण नष्ट झाल्याखेरीज शिक्षणाचा व लोकशाहीचा खरा उपयोग झाला, असे म्हणता येणार नाही. नव्या युगातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक रूढी, परंपरांकडे डोळसपणे पाहावे, असे कळकळीचे विचार डॉ. बाबासाहेब आढाव यांनी व्यक्त केले. दारिद्य्र हा शाप आहे. त्यामुळे लोकशाहीत उणिवा राहतात. म्हणूनच दारिद्य्र नष्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कटिबद्ध व्हावे.
भारत-अमेरिका आर्थिक सहकार्य
नवी दिल्ली – आर्थिक व तांत्रिक क्षेत्रात भारत व अमेरिका यांच्या दरम्यान सहकार्य घडवून आणण्यासाठी उभय देशांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडणार आहे.





