46 वर्षांपूर्वी प्रभात : पैशाच्या अपुर्या पुरवठ्यामुळे शिक्षणावर परिणाम…

पैशाच्या अपुर्या पुरवठ्यामुळे शिक्षणावर परिणाम
नवी दिल्ली, दि. 18 – पैशाच्या अपुर्या पुरवठ्यामुळे शैक्षणिक उद्दिष्ट्ये व कार्यक्रम यावर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. शैक्षणिक मध्य सत्रास मान्यता देताना एका ठरावाद्वारे वरील गोष्ट दाखवून देण्यात आली. सुरुवातीला शिक्षणासाठी 1726 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापि, नंतर ही रक्कम 1200 कोटी रुपयांवर आली. 10+2+3 या शिक्षणक्रमाची अंमलबजावणी तसेच 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची व्याप्ती वाढविणे या कामात अडचणी आल्या. ताबडतोब पावले उचलून काही उपाय जर योजले नाहीत तर शिक्षणाची स्थिती आणखी वाईट होईल.
रंगभूमीला उतरतीकळा येणार नाही याकडे लक्ष
पुणे – उतरती कळा आलेल्या रंगभूमीला सावरण्याचे प्रयत्न झाले असले, तरी तिला पुन्हा पडती कळा येणार नाही, याचा सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. कलेच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा घडत असल्याने आणि कलेची निर्मिती सर्वसामान्यांना आनंद देण्यासाठी असल्याने चांगले कलावंत व चांगले रसिक निर्माण झाले पाहिजेत. तरच उद्याच्या रंगभूमीला चांगले दिवस येतील, असे सुशीलकुमार शिंदे यांनी विशद करून सांगितले.





