Pune : पुस्तकांशी मैत्री! पुण्यातील पीएम श्री केंद्रीय विद्यालयात महिनाभर वाचन अभियान
Pune : पुण्यातील पीएम श्री केंद्रीय विद्यालयात १५ डिसेंबरपर्यंत वाचन अभियान; विद्यार्थ्यांसाठी रोज ३० मिनिटे वाचनासह विविध उपक्रम.

Pune : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि पुस्तक वाचण्याची सवय आयुष्यभर टिकावी, यासाठी पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक २, वायुसेना स्थानक, पुणे येथे विशेष वाचन अभियान राबविण्यात येत आहे. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत हे अभियान सुरू आहे.
‘एक महिना, अनेक पुस्तके, आयुष्यभराची सवय’ अशी या अभियानाची संकल्पना आहे. प्राचार्य भारत भूषण आणि मुख्याध्यापक संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज २५ ते ३० मिनिटे वाचनासाठी राखून ठेवली जात आहेत.
या अभियानात कथाकथन, चित्रवाचन, पुस्तक परीक्षण, पुस्तकांची देवाणघेवाण, वर्तमानपत्र वाचन आणि वाचन भिंत असे उपक्रम घेतले जात आहेत. मोठ्या वर्गांतील विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहन देत आहेत.
वाचनामुळे विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती, कल्पनाशक्ती, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे वाचनाची सवय दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचा विद्यालयाचा प्रयत्न आहे.





