४६ वर्षांपूर्वी प्रभात : ता. 29, माहे जुलै, सन 1977

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी लोकपाल नेमणार
नवी दिल्ली – आज लोकसभेत गृहमंत्री चरणसिंग यांनी लोकपाल नेमण्याबाबतचे विधेयक मांडले. या विधेयकाची 28 कलमे आहेत. या विधेयकामुळे सार्वजनिक नेत्यांच्या गैरवागणुकीबाबतच्या कोणत्याही तक्रारीची चौकशी करण्यात येईल. अशा सार्वजनिक नेत्यांमध्ये पंतप्रधान, खासदार व मुख्यमंत्री यांचा समावेश असेल. चौथ्या लोकसभेपुढे तेव्हाच्या कॉंग्रेस सरकारने 1968 मध्येच हे विधेयक मांडले होते. 1969 साली लोकसभेत मंजूरही झाले; परंतु ते राज्यसभेपुढे असतानाच चौथी लोकसभा विसर्जित करण्यात आली. त्यामुळे ते रद्द ठरले.
प्राणघातक औषधे देणाऱ्यास फाशीची शिक्षा
नवी दिल्ली – प्राणघातक औषधे देणाऱ्यास यापुढे फाशीची शिक्षा देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजनारायण यांनी लोकसभेत सांगितले. याबाबत जो कायदा आहे तो बदलून “जीवाचे बदल्यात जीव’ हे तत्त्व लावले जाईल. चुकीची व खराब औषधे दिल्यामुळे एखाद्याचा प्राण गमावला तर तसे औषध देणाऱ्यास फाशी दिली जाईल. औषधे तपासणीस जर आपल्या कामात हयगय करतील व चुकीची लेबले लावलेली औषधे विक्रीस ठेवण्यास परवाने देतील तर त्यांना जरब बसेल अशी शिक्षा देण्यात येईल. मुंबईत असे बनावट औषधाचे साठे जप्त करण्यात आले आहेत.





