राजगुरूनगर -खेड तालुक्यात 24 तासांत 46 व्यक्तीचे पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील बाधित व्यक्तींची संख्या 612 झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील ग्रामीणसह तीन नगर परिषद हद्दीत ही संख्या बळावत असल्याने तालुक्यात धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात 18 गावे आणि 3 नगरपरिषद कार्यक्षेत्रात मंगळवार (दि. 14) पासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. तरीही संख्या कमी होत नाही.
करोनाची साखळी तोडण्यात नागरिक कमी पडत आहेत. शासकीय यंत्रणा मोठी भूमिका बजावत असताना नागरिकांमधून काळजी घेतली जात नाही. नियम पाळले जात नसल्याने तालुक्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
तालुक्यात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, शासकीय अधिकारी करोनाची शिकार बनत असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कडूस गावामध्ये मागील काही दिवसांपासून एकही करोनाबाधित सापडला नाही.
सुरुवातीला कडूस गावात करोनाचे रुग्ण सापडले; मात्र आता करोना रोखण्यात या गावाला यश आले आहे. दरम्यान, चाकण एमआयडीसीमध्ये शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे का नाही, याची खेड पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी भेट देऊन पाहणी करीत कामगारांना व मालकांना मार्गदर्शन केले.