शिवसेनेचे ५६ पैकी ४५ आमदार संपर्कात; भाजप आमदाराचा दावा

मुंबई – विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत सरकार स्थापनेवरून शीतयुध्द सुरू आहे. मुख्यमंत्रीपद व सत्तेत समान वाटा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर भाजपनेही आक्रमक भूमिका घेत राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल, अशी भूमिका घेतली आहे. अशातच शिवसेनेचे ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप खासदार संजय काकडे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना युती करणे भाग आहे. त्यात शिवसेना सत्तेमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर शिवसेनेच्या मागणीला भाजप नेतृत्व योग्य उत्तर देईल, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी आपली भूमिका मांडली.
दरम्यान, भाजप-शिवसेनेचा सत्तस्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरीही दोन्ही पक्षांनी सोमवारी स्वतंत्रपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. या साऱ्या घटनांमुळे भाजप सेनेतील सत्ता संघर्ष लपून राहिला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाचे चाणक्य अमित शहा हे उध्दव ठाकरे यांची बुधवारी (दि. 30) भेट घेणार आहेत. त्यावेळी शिवसेना नमते घेणार की शहांच्या बोलण्याला मान देणार याबाबत औत्सुक्य आहे.





