देर अल-बलाह (गाझा पट्टा) – इस्रायलकडून रात्रभर झालेल्या माऱ्यामध्ये किमान ४५ जण ठार झाले असल्याचे गाझामधील रुग्णालयांनी म्हटले आहे. काही महिला आणि एक आठवड्याच्या एका नवजात बालकाचाही या माऱ्यामध्ये मृत्यू झाला आहे. इस्रायलने हमासविरोधात नव्याने सुरू केलेली लष्करी मोहिम काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका होते आहे. पाश्चात्य देशांनी इस्रायलवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. पण तरी इस्रायलकडून हल्ले सुरू आहेत. जरी इस्रायलने आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत गाझामध्ये जाऊ द्यायला परवानगी दिली असली, तरी ही मदत प्रत्यक्ष गरज असलेल्या पॅलेस्टिनींपर्यंत पोचण्यात अडथळे येत आहेत. मंगळवारपासून मदतीचे ट्रक गाझामध्ये जाऊ द्यायला इस्रायलने परवानगी दिली. मात्र अजूनही गरजू पॅलेस्टिनींपर्यंत ही मदत पोचलेली नाही. मदतीचे ट्रक पोचल्यानंतर इस्रायली सैनिकांनी या ट्रकमधील धान्य आणि अन्य उपयुक्त वस्तू दुसऱ्या ट्रकमध्ये भरल्या आणि ते निघून गेले. मदत एजन्सीच्या कार्यकर्त्यांना या अन्नधान्याचे वितरण करण्यास अवधी देखील मिळू शकला नाही, असे संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले. इस्रायलचे नियंत्रण असलेल्या दक्षिण गाझामधील केरेम शालोम येथील बॉर्डर क्रॉसिंगवरून आज एकही ट्रक गाझामध्ये जाऊ शकलेला नाही. तर इस्रायलच्या बाजूने पॅलेस्टिनमध्ये ६५ ट्रकनी प्रवेश केला. मात्र हे ट्रक गाझामध्ये पोचलेच नाही, असे अंतर्गत नोंदीवरून आढळते आहे. बुधवारी सकाळी गाझामध्ये ट्रक दाखल होत होते, परंतु गाझामध्ये मदत वाटप सुरू राहू शकेल की नाही हे स्पष्ट नाही, असे मदत वितरणावर देखरेख करणाऱ्या इस्रायली सुरक्षा यंत्रणेने म्हटले आहे. गाझामध्ये येत असलेल्या मदतीच्या ट्रकची संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने मंगळवारी बराचवेळ वाट बघितली. मात्र ट्रक तेथपर्यंत पोचू शकले नाहीत. ब्रिटनकडून इस्रायलवर संताप गाझामध्ये हल्ल्याची व्याप्ती वाढवल्याबद्दल ब्रिटनने इस्रायलबरोबरची मुक्त व्यापार कराराची चर्चा स्थगित केली आहे. ब्रिटन, कॅनडा आणि फ्रान्सने एक दिवस आगोदरच इस्रायलवर राग व्यक्त केला असून कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. याशिवाय गाझामधील युद्धाच्या संदर्भात इस्रायलशी व्यापारी संबंध नियंत्रित करणाऱ्या कराराचा आढावा घेतला जात आहे, असे युरोपीय संघाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास म्हणाल्या. हमासच्या ताब्यातील सर्व ओलिसांची सुटका झाल्यानंतर हे युद्ध थांबवण्यात येईल, असे इस्रायलने म्हटले आहे.