ठाण्यात मनपा शाळेतील 44 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा
Updated On:

ठाणे – दिवा येथील आगासन भागातील ठाणे महापालिकेच्या शाळेतील पाचवी ते सहावीच्या वर्गातील 44 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या मध्यान्ह भोजनात पाल मृत अवस्थेत आढळून आली असून विषबाधा झालेल्या 44 विद्यार्थ्यांपैकी 39 मुलांना पोटदुखी आणि उलटीचा जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर इतर मुलांनाही उपचारासाठी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवा येथील आगासन भागात ठाणे महापालिका शाळा क्रमांक 88 आहे. या शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे मधल्या सुटीत खिचडी देण्यात आली होती. या खिचडीतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.





