पिंपरी | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी ४४ कोटी

मावळ टीम, (वार्ताहर) – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून आजवर मोठ्या प्रमाणात निधी आला आहे.
आता देखील मावळ विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ४४ कोटी १० लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध कामांसाठी निधी मिळण्याकरिता केंद्र, राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्य शासन, पुणे, रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे.
त्यातून गाव, वस्ती, वाड्यातील, आदिवासी पाड्यावरील अंतर्गत रस्ते करण्यात आले. मावळ विधानसभा मतदारसंघातील पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना करण्यासाठी निधी मिळण्याकरिता खासदार बारणे यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. अखेरीस त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
उपलब्ध निधीतून होणारी कामे –
वाऊंड येथे दरड प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधण्यासाठी १ कोटी ५९ लाख ७९१०, वडेश्वर १ कोटी २३ लाख ८८ हजार ८७१, फळणे १ कोटी २ लाख ३८ हजार ९८७ रुपये, मालेवाडी १ कोटी ५१ लाख ४५ हजार ७९९,
वाकसई देवघर करिता २ कोटी ६९ लाख ४६ हजार, आतवणसाठी ९६ लाख ५७ हजार, साई येथील भिंत बांधण्यासाठी ९१ लाख ५ हजार ९४५, शिलाटणे १ कोटी १६ लाख ६७ हजार ९३३, पांगळोली ४५ लाख ४९ हजार ८८९, पाटण १ कोटी ५३ लाख ७० हजार ९१५,
दुधीवरे ७ कोटी ६४ लाख ६८ हजार २२८, भाजे ७ कोटी ६४ लाख ६८ हजार २८८, मोरवे ६० लाख ११ हजार ४५१, वेहेरगाव २ कोटी ६३ लाख ५३ हजार २३,
तुंग येथील राखून ठेवणारी भिंत बांधण्यासाठी ४ कोटी ६१ लाख २ हजार ५४४, भोईनीतील आरसीसी भिंत बांधण्यासाठी ४ कोटी, दसवे येथील १३ कोटी रुपयांचा असा एकूण ४४ कोटी १० लाख ८९ हजार ४३१ रुपयांचा निधी मिळाला आहे.
मावळमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी, पूर प्रवण क्षेत्र आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या दुर्घटनेत मृत्यु होतात. पावसाळ्यात रस्ते बंद करावे लागतात. त्यामुळे दरडीची दुरुस्ती केली जाणार आहे. – खासदार श्रीरंग बारणे, मावळ लोकसभा





