43rd Jr. National (Boys & Girls) Kho Kho C’ship 2024 : महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांने पटकावलं विजेतेपद…

अलिगढ – कुमार व मुलींच्या ४३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी १० व्या विजेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत मुलींच्या संघांनी आतापर्यंत २६ वेळा या स्पर्धेचे विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस् स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसा संघाला नामवित ही कामगिरी केली. अश्विनी शिंदेच्या (३.३०, २.३० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिसावर २४-२० असा ४ गुण व ५.१० मिनिटे राखून ओडिसाचा धुव्वा उडवत विजय मिळवला.
मध्यंतरालाच महाराष्ट्राने १४-१० अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी भोसले (२.१० मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (१.३० मि. संरक्षण), प्रणाली काळे (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) व प्राजक्ता बिराजदार यांनी (२ मि. संरक्षण) दुसऱ्या डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
WPL 2025 Auction : आयपीएलनंतर आता महिला प्रीमियर लीगचा लिलाव; जाणून घ्या, कधी अन् कुठे होणार आयोजन..
सानिका चाफेने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात व दुसऱ्या डावात प्रत्येकी चार खेळाडू टिपले. ओडिसाच्या अर्चना प्रधान (२.०० मि. संरक्षण व ४ गुण ), लीसा राणी (१.०० मि. संरक्षण व ६ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. सर्वोत्तम खेळाडू म्हणून धाराशिवच्या सुहानी धोत्रे ला जानकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


