43rd Jr. National (Boys & Girls) Kho Kho C’ship 2024 : महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने पटकावलं विजेतेपद…

अलिगढ – मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या मुलांनी ओडिसा संघावर ३३-२९ अशी १.३० मिनिटे राखून मात करताना, ४३ व्या कुमार-मुली राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या मुलांनी या स्पर्धेत सलग १९ व्यांदा विजेतेपद पटकावले असून स्पर्धा सुरु झाल्यापासून मुलांचे हे ३५ वे विजेतेपद आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातील धाराशिवच्या जितेंद्र वसावेला सर्वोत्तम खेळाडूच्या वीर अभिमन्यू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाने ओडीसावर ३३-२९ अशी १.३० मिनिटे राखून सहज मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राने १८-१४ ही चार गुणांची आघाडी घेतली होती. हीच आघाडी महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे (२.३०, १.२० मिनिटे संरक्षण व ४ गुण), कृष्णा बनसोडे (१.४०, १.४० मिनिटे संरक्षण व ४ गुण) यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे.
पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात जोरदार साथ दिली. ओडीसाकडून बापी मुरमु (२.००, १.२० मिनिटे संरक्षण व २ गुण ), सुनील पात्रा (१.३०, १.०० मिनिटे संरक्षण व ६ गुण ) यांची लढत अपुरी पडली. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा ‘वीर अभिमन्यू’ पुरस्काराचा जितेंद्र वसावे मानकरी ठरला. आक्रमणासाठी सांगलीच्या प्रेम दळवीला सन्मानित करण्यात आले.


