Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

जम्मू : भारतीय सुरक्षा दलांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या पूॅंच जिल्ह्यात स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट केले. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या विविध गावांमध्ये ती महत्वपूर्ण मोहीम राबवण्यात आली. भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकताच संघर्ष झाला. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने एलओसी लगत भारतीय हद्दीत मारा केला.
पाकिस्तानकडून झालेल्या कुरापतींवेळी एलओसी लगतच्या गावांमध्ये तोफगोळे डागण्यात आले. त्यातील काही स्फोटाविना तसेच पडून राहिल्याची शक्यता विचारात घेऊन भारतीय लष्कर आणि पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. ग्रामस्थांच्या जीविताला धोका असल्याने स्फोट न झालेले तोफगोळे शोधण्याचे कार्य त्या मोहिमेवेळी करण्यात आले.
हाती लागलेले तोफगोळे सुरक्षितपणे नष्ट करण्याची कामगिरी सुरक्षा दलांनी वेळीच केली. त्यासाठी बॉम्बनाशक पथकांची मदत घेण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीतील निवासी भागांवर मारा केला.





