बांगलादेशी घुसखोरांनी काढलेले ४२ भारतीय पासपोर्ट रद्द ! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड : बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले ४२ भारतीय पासपोर्ट शासनाने रद्द केले आहेत. यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे साईनाथनगर, निगडी येथे अनधिकृतरित्या वास्तव्यास असणाऱ्या पाच बांगलादेशी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून देणाऱ्या एजंटला अटक केली.
एजंटकडे केलेल्या चौकशीत त्याने एकूण ४२ बांगलादेशी नागरिकांना पासपोर्ट काढून दिल्याचे समोर आले. त्यामुळे निगडी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने ४२ पासपोर्ट रद्द करण्याबाबत प्रादेशिक पासपोर्ट ऑफीस, पुणे येथे पत्रव्यवहार करुन कळविले होते.
प्रादेशिक पासपोर्ट ऑफिस, पुणे यांनी पडताळणी करुन ४२ भारतीय पासपोर्ट रद्द केल्याबाबतचे आदेश २ जुलै रोजी काढले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, दहशतवाद विरोधी शाखा, निगडी पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी सहायक निरीक्षक अंबरिष देशमुख यांच्या पथकाने केली आहे.





