युरोपीय महासंघाकडून 41 लाख कोटीची मदत

लंडन – करोना विषाणूचा संसर्ग जगभरात 16,15,049 जणांना झाला असून एक लाखाहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. या संकटाची तीव्रता अमेरिकेत सर्वाधिक दिसून येत आहे. अमेरिकेत 4,68,895 रुग्ण आढळले असून 16 हजारपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. तर चिलीने संसर्गमुक्त झालेल्या लोकांना विषाणूमुक्त प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. चिलीमध्ये आतार्यंत 1 हजार 274 जण बरे झाले आहेत. प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. देशात 6 हजार रुग्ण सापडले असून 57 जणांना जीव गमवावा लागला आहे.
युरोपीय महासंघाचा पुढाकार
करोना संकटाला तोंड देणाऱया सदस्य देशांना युरोपीय महासंघाने 41 लाख कोटी (500 अब्ज युरो) देण्याची घोषणा केली आहे. ब्रुसेल्समध्ये युरोपीय महासंघाचे अध्यक्ष मॅरियो सेंटेनो यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. युरोपमधील स्पेनमध्ये सर्वाधिक संकट निर्माण झाले आहे. तेथे 15 हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत आर्थिक संकट
करोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तेथे सुमारे 1 कोटी 68 लोक बेरोजगार झाले आहेत. 10 पैकी 1 व्यक्ती कोरोनामुळे बेरोजगार झाल्याचे मानले जात आहे. रेस्टॉरंट आणि दुकाने बंद झाल्याने आवश्यक सामग्रीची टंचाई भासू लागली आहे. सरकारने फूड बॅंकेच्या माध्यमातून धान्य तसेच अन्नपदार्थ वाटण्यास सुरुवात केली आहे.
शिकागो येथील तुरुंगात 5 कैदी पॉझिटिव्ह आढळले आहेत. कुक काउंटी शेरिफ ऑफिसने आतापर्यंत 276 कैद्यांना लागण झाल्याचे सांगितले आहे. तर एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 172 कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. सुटका करण्यात आलेल्या कैद्यांना शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
न्युझीलंडमध्ये करोनामुळे दुसरा बळी गेला आहे. 90 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांमध्ये 44 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या 1283 झाली असून 373 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात 4520 जणांची चाचणी करण्यात आली आहे.





