पश्चिम बंगालमध्ये 400 परिचारिकांचे राजीनामे

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परतल्या
कोलकाता – देशात करोना विषाणू (कोविड-19) महामारीचे संकट असतानाच पश्चिम बंगालमधील रुग्णालयांमधील 400 परिचारिकांनी आपले राजीनामे देऊन आपापल्या राज्यांत परतल्या आहेत. सूत्रांनुसार शनिवारी मूळच्या मणिपूरमधील 185 परिचारिका आपल्या मणिपूर राज्यात परत आल्या आहेत. तसेच ओडिसा, झारखंड, छत्तीसगड आणि इतर राज्यांतील 186 परिचारिकाही आपापल्या राज्यांत परत गेल्या आहेत.
या सर्व परिचारिका कोलकातासहित राज्याच्या विविध भागांत खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देत होत्या. या परिचारिकांच्या सामूहिक राजीनाम्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पश्चिम बंगाल सरकारने या राजीनाम्यांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केलेली आहे.
पश्चिम बंगाल राज्यात आतापर्यंत 232 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झालेला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज रुग्णालये, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांची नितांत आवश्यकता आहे.
त्यांच्या सेवेमुळेच आज अनेक करोनाबाधित जिवंत राहिले आहेत. अशाप्रकारे आरोग्य कर्मचाऱ्यांनी राजीनामा देणे म्हणजे संकट आणखी वाढल्यासारखे होईल. त्यामुळे या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.





