Ujani Dam : उजनीतून भीमा नदीत पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग; सोलापूर, पंढरपूर, सांगोलासह १०५ गावांना मिळणार लाभ
Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात ४ टीएमसी पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

Ujani Dam : सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात ४ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि सोलापूर शहरासह नदीकाठच्या १०५ गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Ujani Dam)
शुक्रवारी सकाळी दहा वाजता वीज निर्मितीद्वारे १६०० क्युसेक वेगाने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. (Ujani Dam)
राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत. त्यातच भूजल पातळी एक ते दीड मीटरने खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. (Ujani Dam)
उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी व्हावा यासाठी जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. (Ujani Dam)
नदीपात्रातून शेतीसाठी पाणी उपसा होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या भागात वीज पुरवठा केवळ दोन तास सुरू ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. दरम्यान, उजनी धरणामधून सोडण्यात येणारे चार टीएमसी पाणी पुढील चार महिने पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Ujani Dam)

