पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा…; वाचा आजच्या Top 10 News

पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा-
राज्यात ऑक्टोबर महिन्यातील प्रखर उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामानातील मोठा बदल दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा वादळी पावसाचे आगमन झाले आहे. दिवाळीच्या दिवशीच म्हणजेच 21 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदललेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. विशेषतः कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाची शक्यता असून, या कालावधीत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय –
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.
महेश कोठारेंची सुनेला वाचवण्यासाठी मोदी स्तुती
अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे महेश कोठारे यांच्या भाजप प्रेमाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. महेश कोठारे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा भक्त असल्याचे स्पष्ट् केले आहे. तेव्हापासून ते ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. खासदार संजय राऊत यांनी कालच या प्रकरणी त्यांना तात्या विंचू रात्री तुमचा गळा आवळेल असा टोला हाणला होता. त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत स्वतःच्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी त्यांना भाजप प्रेमाचे भरते आल्याचा दावा केला आहे.
इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन-
भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आज काळाच्या पडद्याआड गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO चे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि डॉ. विक्रम साराभाई यांचे निकटचे सहकारी डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील सॅटेलाइट टेलिव्हिजनचे जनक, श्रीहरीकोटा प्रक्षेपण केंद्राचे संकल्पक आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अवकाश संशोधनात संधी देणारे मार्गदर्शक, असा बहुआयामी प्रवास आज थांबला. 26 जुलैला त्यांनी शतकमहोत्सवी वर्ष पूर्ण केले होते. त्यांच्या निधनाने भारतीय अवकाश संशोधनाचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे.
केरळमध्ये राष्ट्रपती मुर्मूंचे हेलिकॉप्टर खड्ड्यात अडकले
केरळमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर लँडिंगनंतर एका खड्ड्यात अडकले. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी भारतीय हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरला खड्ड्यातून बाहेर काढले. केरळमधील पथनमथिट्टा येथील राजीव गांधी स्टेडियममध्ये ही घटना घडली. तेथील हेलिपॅड घाईघाईने बांधण्यात आले होते. “काँक्रीट पूर्णपणे बसले नव्हते, म्हणून जेव्हा हेलिकॉप्टर उतरले तेव्हा ते त्याचे वजन सहन करू शकले नाही आणि चाके जमिनीला स्पर्श करतात तिथे खड्डे तयार झाले.” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणताही विलंब न करता रस्त्याने आपला प्रवास सुरू ठेवला. राष्ट्रपती मंगळवारी संध्याकाळी चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर तिरुवनंतपुरम येथे पोहोचल्या. त्यांनी आज सबरीमाला मंदिराला भेट दिली आणि मंदिराला भेट देणाऱ्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या.
उद्या बंद होणार केदारनाथचे कपाट –
रुद्रप्रयागमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्याची धार्मिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली. पारंपारिकपणे, पंचमुखी डोली (पाच मुखी पालखी) प्रथम मंदिर परिसरात फिरवली गेली, त्यानंतर बाबा केदारनाथ मंदिरात प्रवेश केला. पालखी आत येताच, पुजाऱ्यांनी हिवाळी बंदची तयारी सुरू केली. या प्रसंगी, मंदिर सुमारे १२ क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर दैवी वैभवाने भरला गेला होता. ढोल-ताशांच्या तालावर आणि “हर हर महादेव” च्या जयघोषात देश-विदेशातील भाविकांनी हे चित्तथरारक दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. चारधाम यात्रेच्या या हंगामात आतापर्यंत १७ लाख ४५ हजार भाविकांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाखाहून अधिक आहे.
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. त्यांनी भारत आणि जगभरात राहणाऱ्या भारतीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व्हाईट हाऊस दिवाळी कार्यक्रमात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांना एक महान माणूस आणि एक अद्भुत मित्र म्हटले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
राष्ट्रपती ट्रम्प, तुमच्या फोन कॉलबद्दल आणि दिवाळीच्या उबदार संदेशाबद्दल धन्यवाद. प्रकाशाच्या या सणानिमित्त, आपल्या दोन महान लोकशाही देशांची भागीदारी जगासाठी आशेचा किरण बनो आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहो. असे मोदी म्हणाले.
सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण –
दिवाळीपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून ₹५,६७७ ने कमी झाला आहे आणि चांदीचा भाव त्याच्या विक्रमी उच्चांकावरून २५,५९९ रुपयाने कमी झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ३,७२६ रुपयांनी कमी होऊन १,२३,९०७ रुपये झाली आहे. आज चांदीचे दर १०,५४९ ने घसरून १,५२,५०१ रुपये प्रति किलो झाले.
नीरज चोप्रा बनला लेफ्टनंट कर्नल –
ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राची भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल (मानद) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्याला ही उपाधी प्रदान केली. त्याची आई सरोज देवी, वडील सतीश चोप्रा, काका भीम चोप्रा आणि पत्नी हिमानी मोर हे देखील उपस्थित होते. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी नीरज चोप्रा २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार म्हणून सैन्यात दाखल झाला. २०२१ मध्ये त्याला सुभेदार म्हणून बढती देण्यात आली. टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले. २०२२ मध्ये नीरजला सुभेदार मेजर म्हणून बढती देण्यात आली. आता तो लेफ्टनंट कर्नल बनला आहे.
दीपिका-रणवीरने मुलीची पहिली झलक दाखवली-
दिवाळीच्या खास प्रसंगी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांची मुलगी दुआ पदुकोणचा चेहरा उघड केला आहे. या जोडप्याने त्यांची मुलगी दुआला हातात घेऊन उभे असलेले अनेक फोटो पोस्ट केले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दुआच्या फोटोंवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट केली आहे. राजकुमार रावने एका कमेंटमध्ये दुआच्या गोंडसपणाचे कौतुक केले आहे, तर प्रियांका चोप्रानेही तिला आशीर्वाद दिले आहेत.





