Nigeria attack : नायजेरियात सशस्त्र हल्ल्यात ३८ जणांची हत्या, अनेकांचे अपहरण
नायजेरियाच्या वायव्येकडील झामफारा प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ३८ जणांची हत्या करण्यात आली आणि अन्य काही जणांचे अपहरण करण्यात आले.

अबुजा (नायजेरिया) – नायजेरियाच्या वायव्येकडील झामफारा प्रांतात सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ३८ जणांची हत्या करण्यात आली आणि अन्य काही जणांचे अपहरण करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याबाबतची पूर्वकल्पना गुप्तचरांकडून पोलिसांना मिळाली होती.
मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी पोलिस वेळेपुर्वी पोचू शकले नाहीत आणि हा हल्ला रोखू शकले नाहीत, पोलीस या ठिकाणी पोचेपर्यंत हल्लेखोरांनी हल्ला करून ३८ जणांची हत्या केली होती, असे प्रांताच्या पोलिसांचे प्रवक्ते याझिद अबूबकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
अपहरण झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. झामफारा प्रांतातील अंका या स्थानिक प्रशासकीय भागात टंगन डस्ट समुदायावर हा हल्ला करण्यात आला होता. या भागात वांशिक द्वेषातून असे हल्ले अधून मधून केले जात असतात.
जवळच्याच केब्बी भागात गेल्याच आठवड्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये ३३ जणांची हत्या करण्यात आली होती. आफ्रिकेतील ५५ देशांचा समावेश असलेल्या आफ्रिकन युनियनने या हल्ल्याचा निषेध केला असून अपहरण झालेल्या महिला आणि मुलांच्या सुटकेची मागणीही केली आहे.





