भोर नगरपालिका हद्दीतील 35 झोपड्या हटविल्या; मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचां मार्ग मोकळा

भोर – शहरातील नगरपालिका हद्दीतील नवी आळी येथील महात्मा फुले झोपडपट्टीतील ३५ झोपड्या नगरपालिका प्रशासनाकडून हटविल्या आहेत. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नगरपालिकेकडून या झोपडी धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल दिली जाणार आहेत. यावेळी झोपडी धारकांच्या घरकुल बांधून मिळेपर्यंत तात्पुरत्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे काही वेळ झोपड्या हाटविण्याच्या कामाला झोपडपट्टी सुरक्षा दलाकडून विरोध करण्यात आल्याने झोपड्या हटविण्याचे काम काही वेळ बंद पडले होते. परंतु यावेळी प्रशासनाकडून दाखवण्यात आलेल्या वेगवेगळ्या दोन ठिकाणची जागा झोपडी धाराकांना पसंत पडल्याने त्यांचा तात्पुरत्या निवासीचा प्रश्न मिटला असून प्रशासनाकडून झोपड्या हाटविण्याचे काम चालू होते.
यावेळी भोरचे तहसीलदार सचिन पाटील, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महमंदभाई शेख,जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा भालेराव, माजी नगराध्यक्ष सुधीर खाटपे,शिवसेनेचे नितीन सोनावले, पोलीस, नगरपालिका व महसूल विभाग अधिकारी कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.




