Naxalism : छत्तीसगडमध्ये नऊ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

विजापूर/दंतेवाडा – छत्तीसगडच्या बस्तर भागात शुक्रवारी ३३ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यापैकी २४ जणांवर ९१ लाख रुपयांचे एकूण बक्षीस होते, अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
विजापूर-नारायणपूर सीमेवरील भीषण चकमकीत केशव राव उर्फ बसवराजू आणि इतर २६ कार्यकर्त्यांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर काही दिवसांनीच हे आत्मसमर्पण करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव म्हणाले, माओवादी विचारसरणी, स्थानिक आदिवासींवर गुन्हेगारांकडून होणारे अत्याचार आणि बंदी घातलेल्या संघटनेतील वाढत्या मतभेदांमुळे नऊ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले, आयईडी स्फोट आणि जाळपोळ करण्यात सहभागी होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील २२७ नक्षलवाद्यांनी हिंसाचार सोडला आहे. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये ११९ नक्षलवादी मारले गेले असून २३७ जणांना अटक करण्यात आली आहे.





