ज्येष्ठाची 33 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक; बॅंक मॅनेजरसह आईविरोधात दोषारोपपत्र दाखल

पुणे – कोंढवा येथील फ्लॅट खरेदी, भोरमधील जमिनीचे हक्कसोड पत्र रद्द करणे, पत्नीची वडिलोपार्जित जागा मिळविण्याचे कारणे सांगून करून ज्येष्ठ नागरिकाची 33 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात खडक पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. फसवणूक, संगणमत आणि 406 च्या कलम लावण्यात आलेले आहेत. बॅंक मॅनेजर ज्ञानेश्वर भुजबळ, त्याची आई प्रमिला आणि मयत वडिल बापू भिकाजी भुजबळ यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक एल.एन.सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कुमारदत्त ललित मोहन जोशी (रा. सदाशिव पेठ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी जोशी आणि बापू दोघे मित्र होते. 2002 पासून दोघांची ओळख होती. फिर्यादी आणि बापू यांच्यात पैशाचे व्यवहार सुरू होते. बापू यांची आई आणि मावशीचे नावे असलेली शिरूर येथील जमिनीचे हक्कसोड पत्र रद्द करणे, तसेच भोर तालुक्यातील खापी येथील पत्नीची वडिलोपार्जित जमिन मिळविण्यासाठी न्यायालयीन कामकाज आणि वकिलांना देण्याचे सांगून फिर्यादींकडून वेळोवेळी 18 लाख 70 हजार रुपये घेतले.
मुलगा ज्ञानेश्वर आणि आई प्रमिला यांनी फिर्यादींचा कोंढवा येथील फ्लॅट 51 लाख रुपयांना विकत घेतो. परंतु बॅंक कामकाज आणि भागीदारी म्हणून 15 लाख रुपये मयत बापू यांच्या खात्यात ट्रान्सफर करायला लावले. एकुण 33 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे दोषारोपपत्रामध्ये म्हटले आहे





