Pimpri Chinchwad Ward Structure : 32 प्रभाग, 128 नगरसेवक… कशी आहे पिंपरी-चिंचवड मनपाची प्रभाग रचना? फायदा कुणाचा? समजून घ्या सोप्या भाषेत..

Pimpri Chinchwad Ward Structure : काल बहुप्रतिक्षेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप प्रभागरचनेला शुक्रवारी (दि. २२ अॅागस्ट) सायंकाळी मान्यता दिली. त्यानंतर सायंकाळी आठ वाजता महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली.
आता यानंतर याबाबत ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर ५ ते १२ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेत प्रभागरचना अंतिम करून नगर विकास विभागाला सादर करण्यात येणार आहे.
३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक
त्यानंतर ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.मात्र, पारुप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. पिंपरी चिंचवड प्रारुप प्रभाग रचनेनुसार ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक असणार आहेत. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच ही प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे.
प्रभाग तेच असले तरी …
२०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता होती. आता तब्बल साडेआठ वर्षांनी निवडणूक होणार आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांचा प्रभार असणार आहे. तर प्रभाग रचना ही 2011 च्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रभाग तेच असले तरी त्यातील लोकसंख्या वाढली आहे. प्रत्येक प्रभागात किमान 49 हजार ते कमाल 59 हजार मतदार असतील. मतदारांची संख्या २०११ च्या निवडणुकीनुसार असणार आहे.
त्यामुळे आता १५ वर्षांत मतदारांची संख्या वाढलेली असणार आहे. मात्र, वाढीच्या मतदारांची नोंद यामध्ये नाही. या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षणानुसार जागा निश्चित करण्यात येणार आहे. 128 पैकी 93 जागा आरक्षित असतील.
माजी नगरसेवक व इच्छुकांनी गर्दी
शुक्रवारी रात्री उशिरा महापालिका मुख्यालयाच्या आवारामध्ये प्रभागरचनेचे नकाशे व माहिती प्रसिद्ध करण्यात आली. त्यावेळी प्रभागरचना कशी असेल हे जाणून घेण्यासाठी माजी नगरसेवक व इच्छुकांनी गर्दी केली होती. तर काहींनी संकेतस्थळावर नकाशे पाहत आपल्या निवडणुकीचा अंदाज घेतला.
हेही वाचा : Ajit Pawar : ‘चाकरमानी’ नाही, आता ‘कोकणवासीय’ म्हणा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश, लवकरच परिपत्रक





